Maharashtra

आघाडीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंना बोलावून दाखवा; विनोद तावडेंचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

By PCB Author

April 03, 2019

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज ठाकरेंची अशी लपून मदत काय घेता, तुम्हाला मते हवी असतील, तर आघाडीच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांना बोलावून दाखवा, असे थेट आव्हान भाजप नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला आज (बुधवार) दिले.

लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र, निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावरुनच विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले आहे.

लाज कशी वाटत नाही?, असा प्रचार करणाऱ्या  काँग्रेस – राष्ट्रवादीला  तावडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.  आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला लाज का वाटत नाही? सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, लोक पाणी मागतात तेव्हा करंगळी दाखवली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का?  आम्ही जो विकास केला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, अशा शब्दांत तावडे यांनी पलटवार केला.