“आग लागल्यानंतरही पाण्याची सुविधा नाही. फायर सिस्टिम फेल गेली”; रहिवाशांनी आयुक्तांसमोर व्यक्त केली चीड

0
220

लालबाग, दि.२२ (पीसीबी) : लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल चारची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल चहल घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी या इमारतीतल्या रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे.

आयुक्त चहल घटनास्थळी पोहोचताच इथल्या रहिवाशांनी त्यांना घेराव घातला. चहल यांच्याकडे संताप व्यक्त करत त्यांनी आपली व्यथाही चहल यांनी बोलून दाखवली. रेफ्युजी एरियामध्ये पाण्याची सुविधा ठेवली नाही इतका निष्काळजीपणा केला आहे. इतकी आग लागल्यानंतरही पाण्याची सुविधा नाही. फायर सिस्टिम फेल गेली आहे. २०२० ला सोसायटी तयार झाली. बिल्डर घरे ताब्यात देत नाहीये, असे आरोप रहिवाशांनी केले आहेत.

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता चित्रपटगृहासमोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे.