“आगामी २०२४ लोकसभेसाठी एक व्हा” – ममता बॅनर्जी यांचे सर्व विरोधकांना जाहीर आवाहन

0
342

कोलकाता, दि. ३ (पीसीबी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर विविध भागात हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशावेळी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढाई ही आपली प्राथमिकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विजयानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदनासाठी फोन केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी अद्याप फोन केला नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव शमल्यानंतर आम्ही सर्व मिळून काम करु. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्द्यांवर मिळून काम करु इच्छित आहोत. पण एका हाताने टाळी कधी वाजत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं आहे. तसंच हे वक्तव्य करुन त्यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे.

मी आमदारांची बैठक बोलावली आहे. कोरोना विरोधात कठोरपणे लढावं लागेल. ती आमची प्राथमिकता असेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर गंभीर आरोपही केलाय. नंदीग्राममध्ये मोठी गडबड करण्यात आली होती. रिटर्निंग ऑफिसरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नंदीग्राममधील निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

रिटर्निंग ऑफिसरला जीवे मारण्याची धमकी
ममता बॅनर्जी यांनी एक व्हॉट्सअप मेसेज दाखवत सांगितलं की, रिटर्निंग ऑफिसर म्हणाला की जर काऊंटिंग केलं तर लाईफ एँड डेथची समस्या होईल. मशीन रिकाऊंटिंग करण्यात कसली भीती आहे? मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही. पॉईंट ऑफ गनने काम करावं लागत आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करुन टाकली. ही माफियागिरी चांगली नाही. आम्ही कोर्टात जाऊ. आता कोर्टातच निकाल लागेल, असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

आयाराम-गयारामांना धक्का
निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील आमदार-खासदारांना फोडून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा फॉर्म्युला बंगालच्या निवडणुकीत सपशेल फोल ठरला आहे. बंगालच्या निवडणुकीत मतदारांनी 16 दलबदलूंना नाकारले आहे. तसेच तीन खासदारांनाही पराभूत केले आहे. मतदारांनी आयाराम गयारामांना नाकारल्याने देशाचं राजकारणातही यापुढे हाच ट्रेंड येईल का? याची चर्चा सुरू झाली आहे.

8 आमदार, 16 नेते पराभूत
टीएमसीमधून आलेल्या या नेत्यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यापैकी 8 आमदारांसहीत 16 नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीएमसीतून आलेल्या अर्धा डझन नेत्यांना विधानसभा निवडणुकीत यशही मिळालं आहे. तसेच भाजपने चार खासदारांनाही विधानसभा निवडणुकीत उतरवलं होतं. त्यापैकी तिघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील केवळ एकच खासदार विजयी झाला आहे.

तीन खासदार पराभूत
भाजपने चार विद्यमान खासदारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. त्यापैकी लॉकेट चटर्जी चुंचुरा, स्वपन दास गुप्ता तारकेश्वर, बाबुल सुप्रियो टॉलिगंज विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. निसिथ प्रामाणिक हे दिनहाटा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे निसिथ हे आता खासदार म्हणून काम करणार की आमदार म्हणून सक्रिय राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.