Maharashtra

आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागांवर विजय मिळवू; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास  

By PCB Author

May 28, 2019

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून २२० जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रभाव दिसणार नाही, असेही त्यांनी  म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. तरी भाजपला १२२ जागांवर तर शिवसेनेला ६३ जागांवर यश मिळाले होते.  आता आगामी  विधानसभा निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित करू याबाबत खात्री आहे. विधानसभा निवडणुकीत युतीला २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही ते म्हणाले .

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी आम्हाला एक जागा कमी जिंकता आली. चंद्रपुरात केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पराभवानंतर आम्हाला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला, असे ते म्हणाले.