आगामी लोकसभेसाठी औरंगाबाद-जालन्यात भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादीचे आव्हान!

0
885

औरंगाबाद, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद व जालना या दोन मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. अर्घ्या जागा राष्ट्रवादीला आणि अर्घ्या काँग्रेसला देण्याचा फॉर्म्युला असावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. पण कॉंग्रेस त्यावर अनुकूल नसल्याचे दिसते. मात्र, यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.  

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस सातत्याने पराभूत होत आली आहे. औरंगाबादेतून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे सलग चारवेळा लोकसभेला निवडून आलेले आहेत. ह्या दोन जागा काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडाव्यात असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

प्रामुख्याने मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना लोकसभेची जागा आम्हाला द्या अशा धोशा राष्ट्रवादीने आपल्या नेत्याकंडे लावल्याची चर्चा आहे. खैरे आणि दानवेला आव्हान देऊ शकतील असे उमेदवार म्हणून आमदार सतीश चव्हाण आणि आमदार राजेश टोपे यांची नावे अन्य नावाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चर्चेत आहेत.त्यामुळे, आगामी निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.