आगामी दोन वर्षात भारताची अर्थव्यवस्था टॉपवर – जागतिक बँक

0
386

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – आगामी दोन वर्षात जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था टॉपवर असेल, असे भाकीत जागतिक बँकेने वर्तविले आहे. या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ७.३ टक्के राहणार असला तरी येत्या दोन वर्षात जीडीपी ७.५ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाजही जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

जागतिक बँकेने ‘ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रॉस्पेक्टस’ अहवाल प्रसिध्द  केला आहे. गेल्या दीड वर्षात भारताच्या जीडीपीवर परिणाम करणारे सर्व फॅक्टर संपुष्टात आले आहेत. त्यामुळे भारताचा आर्थिक वृद्धी दर वेगाने वाढणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. या अहवालात भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले आहे.

गेल्या पाच तिमाहीपर्यंत भारताचा आर्थिक वृद्धी दर अत्यंत मंद होता. २०१७ नंतर त्याला गती आली. त्यानंतर जीडीपीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच  गुंतवणुकीच्या स्थितीत सुधारणा होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्याने   भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. मात्र, आता त्यातूनही भारत सावरत आहे, असे   या अहवालात म्हटले आहे.