आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक होणार मुंबईत दाखल!

0
741

देश,दि.१९(पीसीबी) – संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुंबई महानगपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या देशांमधून दररोज २३ विमानं भारतात येत असतात. केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमान यादेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. १८ मार्चपासून हा आदेश लागू झाला आहे. आखाती देशातून येणारे भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. यापैकी येणाऱ्या लोकांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे.

ज्यांचं मुंबईत घर आहे आणि ज्यांची प्रकृती उत्तम आहे त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. परंतु त्यांना आपल्या घरातील अन्य व्यक्तींपासून काही दिवस वेगळं राहावं लागणार आहे. तसंच जे लोक मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणाहून असतील आणि ज्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता नसेल त्यांनाही त्यांच्या घरी पाठवलं जाणार आहे. त्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार नाही, त्यांना खासगी वाहनातूनच जावं लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, देशात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत.