Banner News

#आखाडा विधानसभेचा : दत्ता साने यांनी लांडगे, लांडेंविरोधात थोपटले दंड

By PCB Author

July 29, 2019

भोसरी, दि. २९  (पीसीबी) – भोसरी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ इच्छुक असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना तिकीट मिळणार नाही. त्यांच्या ऐवजी लोकसभेला ऐनवेळी डावलले माजी आमदार विलास लांडे यांना तिकीट निश्चित असल्याचे संकेत साने यांना मिळाले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढण्याचे ठरविले असून विद्यमान आमदार महेश लांडगे व विलास लांडे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरी, चिंचवड व पिंपरी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी महिला अध्यक्ष विद्या चव्हाण व युवा नेते पार्थ पवार यांनी रविवारी पुण्यात घेतल्या. त्याला दत्ता साने यांनी मात्र, दांडी मारली. आपल्याला तिकीटच मिळणार नसेल तर मुलाखत देऊन तरी काय उपयोग, असा ग्रह साने यांचा झाला असावा, त्यामुळेच त्यांनी मुलाखत देणे टाळले. असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साने यांनी जाहीर शुभेच्छा दिल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याला मुलाखतीला गैरहजर राहून अधिकच पुष्ठी मिळाली. मागील विधानसभा निवडणूकीत त्यांनी महेश लांडगे यांना निवडून आणण्यासाठी कष्ठ घेतले. मात्र, यावेळी ते लांडे व लांडगे यांच्यापैकी कुणालाच पाठिंबा देण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. या उलट थेट त्यांनाच टक्कर देणार असल्याचे सुतोवात त्यांनी दिले आहेत.

परंतु,राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली किंवा काही राजकीय वाटाघाटी झाल्या. तर ते आपला निर्णय बदलतील का, हे आगामी काळच ठरवेल.