आकुर्डीत चौघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकीस्वराला मारहाण करुन लुटले

0
440

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाला चौघाजणांच्या टोळक्यांनी दिवसाढवळ्या थांबवून मारहाण केली. तसेच त्याच्याजवळी मोबाईल आणि रोख असा एकूण २२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या दरम्यान घडली.

याप्रकरणी अमोल अश्रुबा नाईक (वय ३०, रा मोईगाव, ता. खेड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास फिर्यादी अमोल हे त्यांच्या दुचाकीवरुन खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक दरम्यान जात होते. ते गरवारे कंपनीच्या गेट समोर आले असता चार जणांनी मिळून त्यांची दुचाकी अडवली. चौघांनी अमोल यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बावीस हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी चौघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आरदवाड तपास करत आहेत.