आकुर्डीतील महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने माहिती अधिकार कायद्याची गोपनीयता भंग केल्याने  गुन्हा दाखल

0
789

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने माहिती अधिकार कायद्याची गोपनीयता भंग केल्याने एका विद्युत वितरण समितीच्या सदस्याने आकुर्डीतील महावितरण उपविभागीय कार्यालयातील ठेकेदाराविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवार (दि.२४ ऑक्टोबर) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख अमराळे असे महावितरण कार्यालयातील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१८ मध्ये कोल्हटकर यांनी मोशी प्राधिकरण पेठ क्र.६ येथील ‘प्रिव्हीया बिझनेस सेंटर’ या व्यावसायिक इमारतीच्या विज जोडणी कामे, बेजबाबदारपणे बसविण्यात आलेली रोहित्रे आणि इतर संबंधित वीज उपकरणाविषयी तसेच इतर आवश्यक माहिती मिळण्याबाबत महावितरण अभियंता रास्ता पेठ, पुणे यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करुन माहिती मागवली होती. मात्र एप्रिल ते ऑगस्ट २०१८ या पाच महिन्या दरम्यान महावितरण कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची माहिती कोल्हटकर यांनी देण्यात आली नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्धवट माहिती टपाला व्दारे देण्यात आली. यामुळे १२ ऑक्टोबर रोजी कोल्हटकर यांनी पुन्हा नव्याने महावितरण कार्यालयात माहितीच्या अधिकारात अर्ज पाठवून माहिती मागवली. यावर आकुर्डी महावितरण उपविभागीय कार्यालयातून २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास गोरख अमराळे या महावितरण कार्यालयातील ठेकेदाराने कोल्हटकर यांना फोन करुन मी महावितरण अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सांगतो असे सांगितले. दरम्यान माहिती अधिकाराबाबत महावितरण अधिकाऱ्याने संबंधीत अर्जदारास माहिती देणे बंधनकारक आहे.

मात्र महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तसे न करता कोल्हटकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेली  माहिती गोपनीय न ठेवता तेथील ठेकेदाराला सांगून फोन करुन त्रास देण्यास सांगितला. यामुळे कोल्हटकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गोरख आमराळे या महावितरणाच्या ठेकेदाराविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिंपरी पोलीसांनी त्यानुसार आमराळे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन आमराळे याच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे.