Pimpri

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विदयार्थ्यांनी चिकाटी बाळगावी – आमदार महेशदादा लांडगे

By PCB Author

August 03, 2022

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – दत्तनगर, विद्यानगर, काळभोर नगर, अजंठा नगर, पांढरकर वस्ती या प्रभाग क्रमांक – २० मध्ये नुकताच विदयार्थी गुणगौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाला दत्तनगर, विद्यानगर परिसरातील वर्ल्ड बुक ऑफ इंडिया रेकॉर्डसाठी दानपट्टा,तलवार बाजी या खेळातील विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नुकतेच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अभिनय क्षेत्रात निवड झालेल्या आकांक्षा पिंगळे हिचा ” सुमी ” चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मानही करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये छाया मोरे व ओम मोरे या आई व मुलाने एकाच वेळी अनुक्रमे ७४% व ७६% गुण मिळवून पास झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश लांडगे माजी नगरसेविका सुजाता पालांडे, राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे, किरण भोसले, माजी नगरसेवक राजू दुर्गे, संजय शिरसाळकर, नंदा करे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात १६७ विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार महेशदादा लांडगे यांनी विदयार्थ्यांना संबोधतांना त्यांच्या आजोबांशी निगडीत एक आठवण सांगून ते म्हणाले कि, ” माझे आजोबा पट्टीचे पैलवान होते. त्यांनी ध्येय आणि चिकाटी बाळगून त्यांच्या क्षेत्रात उत्तम करिअर केले, तेव्हापासून मलाही कुस्ती आणि पैलवानकीचे वेड जडले आणि तेच ध्येय मनाशी बाळगून एक चांगला पैलवान होण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हापासून मला पैलवान महेश लांडगे म्हंटलेले आवडते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून नॉव्हेल्स एन आय बी आर कॉलेज आॕफ हॉटेल मॕनेजमेंटचे प्राचार्य वैभव फंड यांनी विदयार्थ्यांना संबोधतांना म्हंटले कि १० वी आणि १२ वी नंतर पारंपारिक अभ्यासक्रमांकडे न वळता अपारंपारिक अभ्यासक्रमांचाही विचार करावा. त्यांनी हॉटेल मॕनेजमेंट हा पूर्णतः वेगळ्या वाटेवर नेणारा अभ्यासक्रम निवडून विद्यार्थी कशाप्रकारे आपले शैक्षणिक करिअर घडवून विदेशात नोकरीची संधी मिळवू शकतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. वैभव फंड यांनी सचिन तेंडूलकरचा एक छोटासा किस्सा सांगून मोठी माणसं कशी घडतात याचं उत्कृष्ट उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवलं.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन नगरसेविका अनुराधा गोरखे व अमित गोरखे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.