Pune Gramin

आई-वडिलांचा प्रेमसंबंधाला विरोध; ऑनर किलिंगच्या भीतीमुळे तळेगावातील तरूणींची उच्च न्यायालयात याचिका

By PCB Author

May 07, 2019

पुणे, दि. ७ (पीसीबी) – अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरूण-तरूणीला तरूणीच्या घरच्यांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. या ऑनर किलिंग घटनेच्या भीतीमुळे   आज (मंगळवारी) एका तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात आपल्याच आई-वडिलाविरूध्दात  याचिका दाखल केली आहे.

या तरूणीचे नाव प्रियंका शेटे (वय १९) असे आहे. ती  पुण्यातील तळेगावनजीक नवलाख उंबरे या गावाची राहिवासी आहे.  गेल्या तीन वर्षांपासून प्रियंकाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत.  याची माहिती  घरच्यांना  समजल्यानंतर त्यांनी प्रियंकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर प्रियंकाने  पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने प्रियंकाने   मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर  न्यायालयाने  तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत.

प्रियंकाचे महाविद्यालयातील एका तरुणावर प्रेम आहे.  मात्र, हा तरूण अनुसूचित जातीचा असल्याने घरच्यांचा या नात्याला विरोध आहे. लग्न केल्यास नातेवाईकांकडून आपल्या व प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही प्रियंकाने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पोलिसांना तसे  आदेशही दिले आहेत.