Banner News

आई-बापांनो पोरं सांभाळा, अन्यथा… – पिंपरी चिंचवड शहर आता बाल गुन्हेगारांच्या विळख्यात

By PCB Author

December 17, 2020

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

खून, खंडणी, दरोडे, बलात्कार, अपहऱण, तोडफोड, चोरी, लुटमारी, मारामारी हे आता पिंपरी चिंचवडकरांना नित्याचे आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणात बेरोजगारी, आर्थिक विषमता, शिक्षणाचा अभाव, सोशल मीडियाचे प्रस्थ तसेच आई-वडिलांकडून होणाऱ्या संस्काराचा अभाव ही त्यामागची मुख्य कारणे. हे सारे काल होते, आता ते पटीत वाढले आणि मेट्रो शहर झाल्यामुळे उद्या त्याचा कळस होणार हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही. आता ते कसे रोखायचे हे जसे पोलिसांच्या हातात आहे तसेच ते समाजाच्या आणि बऱ्याच अंशी आई-बापांच्याही हातात आहे. कारण आज शहरातील भाईगिरीत दिसणारी पिलावळ पाहिल्यावर परिस्थिती चिंताजनक आहे. गंभीर गुन्ह्यातील तब्बल २३४ बाल गुन्हेगार रेकॉर्डला आहेत. रोज त्यात भरल पडतेच आहे. जे गुन्हेगारी विश्वात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडले गेलेत असे किमान दोन हजारावर असा एक अंदाज आहे. म्हणजे हे उद्याचे भाई, दादा आहेत. तेच उद्या राजकारणात येणार आणि तुमचे आमचे जगणे मुश्किल करणार आहेत, हे लक्षात घ्या.

शेंबड्या पोरांच्या टोळ्यांचा हैदोस – आकुर्डी, निगडी ओटा स्किम, नेहरुनगर, वेताळनगर, चिंचवड स्टेशन, खराळवाडी, धावडे वस्ती, भोसरी, बालाजीनगर, लालटोपीनगर, लिंग रोड, चिंचवडेनगर, मोहननगर, रामनगर, सांगवी, काळेवाडी, थेरगाव, रावेत, कुदळवाडी हे आता गुन्हेगारांचे अड्डे बनलेत. धक्कादायक बाब म्हणजे मिसरूड फुटलेल्या पोरांच्या टोळ्या आहेत आणि त्यात १८ वर्षांखालचे अल्पवयीन `भाई` निपजलेत. दोन महिन्यापुर्वी नेहरुनगरला राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याच्या मुलाने हाताता कोयते, काठ्या, तलवारी घेऊन १०० जणांची टोळी फिरवून दहशत केली. अगदी आजचे ताजे प्रकरण घ्या. १९-२० वर्षांच्या मुलांनी १४ वर्षांच्या मुलींवर बलात्कार केला. त्यात पाचजण सापडले. महिन्यापूर्वी वेताळनगरला तोडफोड झाली त्यात पोरटोरच होती. शहरातील वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये बहुतांश मुले २०-२२ वर्षांच्या आतील आहेत. सराईत गुन्हेगार, काही राजकारणी आणि खंडणीबहाद्दर अशा लहान मुलांना वाम मार्गाला लावतात. त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांचे आयुष्य उध्वस्थ करतात. दारु, मटका, जुगार अड्यावरसुध्दा आता लहान मुले सापडतात. मुलींची छेडछाड हे गल्लीबोळ आणि चौकाचौकातले चित्र आहे. आता त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे शहराचा हा भेसूर, विद्रुप चेहरा स्वच्छ करायचा विडा आताचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी उचलला आहे म्हणून थोडे हायसे वाटते.

२३४ मुले ही आपत्ती नव्हे तर संपत्ती – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहर गुन्हेगारी मुक्त करण्याचे आश्वासन दिले आणि त्या दिशेने एक एक दमदार पाऊल टाकायला सुरवात केली. बालगुन्हेगारी निर्मुलन, पुर्नवसन हा त्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा. महिन्यापूर्वी ऑटो क्लस्टर सभागृहात या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरातील बिनसरकारी संस्था, संघटना (एनजीओ), सामाजिक कार्यकर्ते, कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला. विशेष स्वागतार्ह गोष्ठ म्हणजे पोलीस आणि एनजीओ एकाच व्यासपीठवर आले. आता गेले चार दिवस या विषयावर मंथन सुरू आहे. बाल गुन्हेगार असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी हे वर्ग घेतले. त्यात त्यांचा ब्रेन वॉश करणे, त्यांना मानसिक आधार देणे, मानसोपचार तज्ञांची तसेच वैद्यकीय मदत देणे, समुपदेशन, संरक्षण देणे आणि सन्मार्गाला लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश. स्वतः आयुक्तांनी त्यासाठी यंत्रणा कामाला लावली. त्यांची तळमळ, स्वच्छ सामाजिक हेतू पाहून मदतीचे असंख्य हात पुढे आलेत. या मुलांना समाजाचे जबाबदार नागरिक बनविण्याचा संकल्प आहे. त्यांच्यावरचा गुन्हेगार हा शिक्का पुसून टाकायचा. त्यांच्या आई-वडिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी हा आटापिटा आहे. २३४ मुले ही या देशाची आपत्ती नाही तर संपत्ती आहे हे त्यातून दाखवायचे आहे.

उपक्रम अत्यंत स्तुत्य, पण प्रथम हे करा… आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांच्या टीमचा हा प्रयोग अत्यंत चांगला आहे, पण त्यासाठी काही थोडे अधिकचे काम करावे लागणार आहे. फांद्या छाटून उपयोग नाही तर मुळावर घाव घातला पाहिजे. या मुलांना बदलण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना समजावणे, मुलांना रोजगार मिळवून देणे, चरितार्थाचे साधन देणे वगैरे होईल. पिंपरी चिंचवड शहरात ही किड फोफावली कारण राजकारण आहे. त्यासाठी राजकीय मंडळींना चाप लावावा लागेल. त्यांच्या मुस्क्या आवळाव्या लागतील. जिथे कुठे या बालशक्तीचा गैरवापर होते ती ठिकाणे सिल करावी लागतील. छोटे मोठे गुन्हे करायचे आणि नंतर त्यातून सोडविण्यासाठी भाऊ, भाई, दादा, नाना यांनी पोलिसात जामीन मिळवून द्यायचा. त्या उपकाराच्या ओझ्याखाली पुन्हा मोठे गुन्हे करायचे, पुन्हा नेत्यांनी चौकीत जाऊन त्याला सोडवायचे. या दृष्टचक्रात पोर अडकली आणि गुन्हेगार झालीत. गुन्हेगार बनविण्याचे कारखानेच आमच्या अनेक नेत्यांनी सुरू केलेत, ते प्रथम बंद करा. या आयुक्तांमध्ये ती धमक आहे, कारण त्यांनी नगर, नांदेड, सोलापुरात तिथल्या आमदारांनाही जेलची हवा दाखवली, एकालाही माफ केले नाही. खोडावर घाव घाला झाड आपोआप उन्मळून पडेल. प्रयोग यशस्वी झाल तर हा समाज तुम्हाला आयुष्याचा दुवा देईल. तुम्हाला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा…