Desh

आई नव्हे कसाई ! ‘नकोशी’ला फेकलं पण कुत्र्यांनी वाचवलं, CCTV मध्ये घटना कैद

By PCB Author

July 21, 2019

हरियाणा, दि, २१ (पीसीबी) – हरियाणाच्या कैथल येथे माणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून येथे एका आईने आपल्या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि चिमुकलीचा जीव वाचवला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इथल्या डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडलीये. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लास्टिक तोंडात पकडून बाहेर काढले आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवजा ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरीक जमा झाले आणि त्यांच्या  सर्व प्र कार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. थोड्याचवेळात परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली, आणि प्रत्येकजण घटना ऐकून अवाक् झाला होता. पोलसांनी या चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचे वजन १ किलो १०० ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे.

 

सध्या पोलीस चिमुकलीला फेकणाऱ्या त्या आईचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.