Pune

आईला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिण-भावाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

By PCB Author

October 08, 2018

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पानशेत धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आईसमवेत गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय १७) आणि वैष्णवी दत्तात्रेय भगत (वय १४) अशी मयतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आई सविता दत्तात्रेय भगत, मावसभाऊ व काका यांच्यासह प्रथम आणि वैष्णवी ही भावंडे कपडे धुण्यासाठी गेली होते. सविता या कपडे धूत असताना त्यांचा पाय घसरून त्या खोल पाण्यात पडल्या. या वेळी कुणालचा मावसभाऊ त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी पाण्याकडे गेला. त्या वेळी कुणाल व वैष्णवीही धावले.  मावसभावाने सविता यांना पाण्याबाहेर काढले; परंतु त्याचदरम्यान कुणाल व वैष्णवीदेखील पाण्यात उतरून खोल बाजूला गेले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  पोलिसांनी स्थानिक भोई समाजाचे ईश्वर महाडिक, रमेश महाडिक, माजी सरपंच विलास तारू यांच्या मदतीने भावंडांचा पाण्यात शोध घेतला. दुपारी सव्वाचारला त्यांचे मृतदेह आढळले. ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.