आईला कोरोना झाल्याचे समजताच, त्या करंट्या पुत्राने काय केले पहा…

0
448

हैद्राबाद, दि. ४ (पीसीबी) – प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचं एक विशेष स्थान असतं. लहानपणापासून आई आपल्या मुलाचे सर्व हट्ट पुरवत असते. मुलाच्या आनंदात, दुःखात आई नेहमी त्याच्या सोबत असते, अनेकदा आपलं मुल आजारी पडलं की आई कशाचाही विचार न करता रात्रंदिवस त्याची काळजी घेत असते. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. या खडतर काळात अनेक ठिकाणी माणुसकीचे खरे रंग पहायला मिळत आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात वयोवृद्ध आईला कोरोनाची लागण झाल्याचं समजतात, मुलाने तिला बसस्थानकात एकटं बसवून घटनास्थळावरुन घरी जाणं पसंत केलं.

गुरुवारी रात्री माचरेला शहरातील बसस्थानकात व्यंकटेश राव या मुलाने आपल्या ८० वर्षीय आईला बसस्थानकात बसवून घरी निघून जाणं पसंत केलं. शुक्रवारी सकाळी स्थानिक लोकांना एक वयोवृद्ध स्त्री बसस्थानकात बसून असल्याचं समजलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. काही दिवसांपूर्वी ही महिला गोव्यात आपल्या मुलीकडे गेली होती, या प्रवासादरम्यान तिला करोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आईचा करोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर व्यंकटेशने तिला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी बसस्थानकात नेलं. तिकडे तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असं सांगून व्यंकटेश गेला तो परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांना या महिलेबद्दल समजताच त्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली. चौकशी केल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला विलगीकरण कक्षात हलवलं आहे. या महिलेचा मुलगा दिव्यांग असल्याचं पुढे आलं, आपल्या परिवारातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होऊ नये या भीतीमधून आपण हे कृत्य केल्याचं मुलाने कबूल केलं. त्यामुळे पोलिसांनी आता मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने या मुलाची मदत करायचं ठरवलं आहे.