आईच्या भेटीने कणखर मीराबाईही झाली भावनाविवश

0
203

इम्फाळ, दि.२७ (पीसीबी) :  ऑलिंपिक स्पर्धेत ४९ किलो वजन गटात २१५ किलो वजन उचलून आपला कणखरपणा दाखवणारी रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू आज आईला भेटल्यावर आपल्या भावना लपवू शकलू नाही. तिच्या भेटीने कणखर मीराबाईही एक वेळ भावनाविवश झाली.

रुपेरी कामगिरीनंतर मीराबाई मायदेशात परतल्यावर आज आपल्या घरी इम्फाळला गेली. त्या वेळी आईला भेटल्यावर मीराबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदकाच्या कामगिरीनंतर मीराबाईसाठी आज दिवस सर्वात भावनात्मक होता. मायदेशात परतल्यावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. त्यानंतर आज ती सकाळी लगेच आपल्या घरी रवाना झाली. दिल्ली विमानतळावर विमानतळ अधिकाऱ्यांनीच तिचे स्वागत केले. पण, इकडे इम्फाळला चित्र वेगळे होते. तिचे कुटुंबिय आणि गावकरी मोठ्या प्रमाणावर तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मीराबाईने सर्व प्रथम आई ओंगबी तोंबी लेईमा आणि वडील किर्ती मेईतेई यांना नमस्कार करून त्यांची भेट घेतली. तेव्हा आपले अश्रू आवरू शकली नाही.

सराव आणि स्पर्धांच्या व्यग्र कार्यक्रमामुळे गेली काही वर्षे मीराबाई आपल्या घरापासून दूर राहिली आहे. त्यामुळे आज घरी परतल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद अधिक फुलला होता. विजयानंतर खूप सारा पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मीराबाईने आज आपल्या घरी आईने बनवलेल्याच खाण्याचा आस्वाद घेतला.

मीराबाई म्हणाली, ‘गेल्या पाच वर्षात मी केवळ पाच वेळा घरी येऊन गेली आहे. आता काही दिवस मला येथेच कुटुंबियांसोबत रहायचे आहे आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे.’
रुपेरी यशानंतर घरी इम्फाळ येथे आल्यावर मीराबाई चानू हिची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.