आईचा विश्वास जिंकला! डॉक्टरांनी ब्रेनडेड जाहीर केलेला मुलगा आला शुद्धीवर

0
620

हैदराबाद, दि. १० (पीसीबी) – तुम्ही याला चमत्कार समजा किंवा समजू नका पण आईचे प्रेम, दृढ विश्वास आणि प्रार्थनेमुळे बिछान्याला खिळलेला मुलगा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. तेलंगणमध्ये ही अविश्वसनीय घटना घडली आहे. अठरा वर्षाच्या गंधम किरण डेंग्यु, कावीळ आणि हेपेटाईटिस बी ने आजारी होता. त्याची प्रकृती गंभीर होती.

मुलाच्या ढासळत्या प्रकृतीच्या चिंतेमध्ये असलेल्या कुटुंबाने त्याला हैदराबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. तीन जुलैला डॉक्टरांनी किरण ब्रेनडेड असल्याचे जाहीर केले. मुलगा ब्रेनडेड असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सिदाम्माला प्रचंड दु:ख झाले. पण तिचे आईचे मन ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते.

आपला मुलगा एकदिवस बरा होणार हा भाबडा आशावाद तिच्या मनामध्ये होता. ती किरणला पिल्लालमारी या गावच्या घरी घेऊन आली. किरणला लाईफ सपोर्ट् सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सिदाम्माला ही सिस्टिम काढून मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले. पण मुलाने शेवटचा श्वास घरामध्ये घ्यावा असे तिला वाटत होते म्हणून लाईफ सपोर्ट् सिस्टिमसह मुलाला गावच्या घरी आणले.

अखेर तीन जुलैच्या रात्री तिची प्रार्थना फळाला आली. सिदाम्माला किरणच्या चेहऱ्यावरुन ओघळणारे अश्रू दिसले. तिने लगेच स्थानिक डॉक्टर जी. राजाबाबू रेड्डी यांना बोलावले. मी तपासले तेव्हा किरणची नाडी मंदगतीने सुरु होती. मी लगेच हैदराबादमधल्या त्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधला व त्यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी मला रुग्णाला चार इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

किरणच्या प्रकृतीती आता हळूहळू सुधारणा होत आहे. सात जुलैला त्याची प्रकृती स्थिर होती आणि आता तब्येतीत चांगला फरक पडला आहे. तो आता त्याच्या आईबरोबरही बोलतो असे रेड्डी यांनी सांगितले. मी माझ्या आयुष्यात पाहिलेला हा पहिला चमत्कार आहे असे ते म्हणाले. सिदाम्माच्या पतीचे २००५ साली निधन झाले.