आंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद

0
520

औरंगाबाद, दि. १४ (पीसीबी) – ‘भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडून बोलणी तोडलेली नाही. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केले.

‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीजी बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षांना सोबत घेण्याचीही आमची तयारी आहे. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात ? त्यांना किती जागा द्याव्यात, याबाबत बोलणी सुरू आहे. शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे. त्यामुळे एमआयएमशी जमेल असे वाटत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याशी माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

२०१९चा मुख्यमंत्री मीच असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले होते, त्यावर चव्हाण म्हणाले, ‘लोकांना मतदान करू द्या, मग ठरवा. सध्याच्या राज्याच्या परिस्थितीचा विचार केला तर लोक मंत्र्यांनी फिरू देणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. चार वर्षांत सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्याचा फटका बसणार आहे. जनसंघर्ष यात्रेतून काँग्रेस उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. नगरची जागा काँग्रेसने लढवावी, अशी आमची इच्छा आहे,’ असे त्यांनी सांगितले. आपण लोकसभा लढविणार की विधानसभा असे विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे.’ वेट अँड वॉच असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. ‘काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या अदलाबदलाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. जालना लोकसभेसाठी काँग्रेसकडे उमेदवार आहे,’ असे चव्हाण यांनी सांगितले.