आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच सिद्ध होतील- दिलीप कांबळे

0
1427

नगर, दि. ५ (पीसीबी) – ‘भारिप-बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच आता सिद्ध होतील’, असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी येथे केला. ‘त्यांचे त्यांच्याशी संबंध आहेतच, पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर भाष्य करणार नाही’, असेही कांबळेंनी स्पष्ट केले. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला काही अघटीत घडू नये म्हणून सरकारद्वारे आवश्यक दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या मनपा निवडणुकीतील जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकारांशी बोलताना कांबळे यांनी भीमा कोरेगावमध्ये मागीलवर्षी १ जानेवारीला घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने भाष्य केले. गेल्यावर्षी १ जानेवारीच्या आदल्या दिवशी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणे केली होती. षडयंत्र रचले गेले. भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ काही करण्याचा त्यांचा इरादा अलर्ट असलेल्या प्रशासनाने हाणून पाडला. त्यामुळे आता पुन्हा डिसेंबर जवळ आल्यावर त्यांच्याकडून काही विधाने सुरू आहेत. पण या वेळी कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, स्तंभापासून जवळ असलेल्या मैदानात सभेला परवानगीचा विचार करता येईल तसेच शनिवारवाड्यावर त्यांनी आता सभा करूनच दाखवावी. त्यांची गाठ सरकारशी असेल, असेही कांबळेंनी आवर्जून स्पष्ट केले.