आंबेगाव तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुलीचा दुर्देवी मृत्यू

0
422

आंबेगाव, दि. २५ (पीसीबी) – बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे घडली.

श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रुतिकाची आई स्वाती महेंद्र थिटे या पाच दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी आपल्या माहेरी साकोरे येथे आल्या होत्या. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील शेतात श्रुतिकाची आज्जी कुसुम कडूसकर आणि आई स्वाती थिटे या जनावरांसाठी मका कापत होत्या तर जवळच श्रुतिका खेळत होती. यावेळी मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक श्रुतिकावर हल्ला केला आणि तिला जबड्यात उचलून पळू लागला. हे पाहताच आई आणि आज्जीने आरडाओरडा करीत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत बिबट्या श्रुतिकाच्या गळ्याचा चावा घेऊन तिला तिथेच टाकून पळून गेला होता. श्रुतिकाच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याने त्या अवस्थेत श्रुतिकाला प्रदीप कडूसकर यांनी आपल्या वाहनातून तत्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, उपचारांपूर्वीच श्रुतिकाचा मृत्यू झाला.