आंध्र प्रदेशमध्ये माओवाद्यांनी विद्यमान आमदार आणि माजी आमदाराची गोळ्या झाडून केली हत्या

0
489

विशाखापट्टणम, दि. २३ (पीसीबी) – आंध्र प्रदेशच्या दंबारीकुडा भागात रविवारी (दि. २३) दुपारी माओवाद्यांनी आजी आणि माजी आमदाराची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. आरकू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किदारी सर्वैश्वर राव आणि माजी आमदार सिवरी सोमा असे हत्या केलेल्यांची नावे आहेत. आमदार किदारी सर्वैश्वर राव हे टीडीपीचे आमदार आहेत. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरू असताना या हत्या करण्यात आल्या.

किदारी सर्वेश्वरा राव यांनी वायएसआरसीपीच्या तिकिटावर अराकूमधुन आमदारकीची निवडणूक जिंकली पण नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. किदारी सर्वेश्वर राव आणि सिवरी सोमा हे दंबारीकुडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ६० माओवाद्यांनी एकत्र येऊन हल्ला केला. यामध्ये महिलाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.

नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सर्व राजकारण्यांना नक्षलग्रस्त भागामध्ये जाण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे असे ग्रामीणचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले. आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि सोमा यांनी त्यांच्या भेटीची कोणतीही कल्पना दिली नव्हती असे शर्मा यांनी सांगितले. किदारी राव यांच्यावर बेकायद खाणकामाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता. बॉक्साईटच्या खाणकामाला पाठिंबा दिल्याबद्दल याआधी त्यांना माओवाद्यांनी धमकी सुद्धा दिली होती. मागच्या काही दिवसांपासून माओवादी या दोघांच्या मागावर होते. त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.