आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
539

पुणे, दि. २१ (पीसीबी) –  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेनुसार पुण्यामध्ये जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, योगा संघटना, बी.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  बी.जे.महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय योग  दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  बी.जे. महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ. ननंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार प्रशांत आवटी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, ऑलिम्पीयन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर,  शासकीय अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची  प्रात्यक्षिके केली.  यावेळी उपस्थ‍ितांना योग मार्गदर्शिका पुस्त‍िकेचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थ‍ितांचे स्वागत उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले तर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आभार मानले.