Sports

अॅथलेटिक्स संघ रचनेवर अखेर पडदा

By PCB Author

July 23, 2021

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या ऑलिंपिक स्पर्धेवरील पडदा आज उघडणार असतानाच, भारतात ऑलिंपिकसाठी अॅथलेटिक्स संघ रचनेवर एकदाचा पडदा पडला. ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्यानंतर भारताचा लांब उडीमधील खेळाडू एम. श्रीशंकर आणि २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीमधील धावपटू के.टी. इरफान यांना संघातून वगळण्याची चर्चा जोर धरत होती. ऑलिंपिक पात्रता सिद्ध केल्यानंतरही या दोघांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. अनेक प्रयत्न करूनही इरफानला अपेक्षित वेळ देता येत नव्हती. श्रीशंकरही ७.५५ मीटरच्या पुढे जाऊ शकत नव्हता. अॅथलेटिक्स महासंघाने घेतलेल्या तंदुरुस्ती चाचणीतही ते फारसे यशस्वी ठरले नाहीत.

यात भर म्हणजे बंगळूर येथे घेण्यात आलेल्या चाचणीतही ते प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ऑलिंपिकला न पाठविण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, निवड समितीने बोलावण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या दोन्ही खेळाडूंवर विश्वास कायम ठेवला. ऑलिंपिक तोंडावर असताना खेळाडूंवर अविश्वास दाखवणे बरोबर नाही. त्याही पेक्षा महासंघाने खेळाडूंची तंदुरुस्ती पाहण्यासाठी शिबीर बोलवाले होते. त्यांचा फॉर्म तपासण्यासाठी नाही, असा निष्कर्ष काढत निवड समितीने या दोघांना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

निवड समितीच्या विश्वासामुळे या दोघांचे ऑलिंपिक स्वप्न साकार होणार आहे. आता त्यांच्या विश्वासाला खरे उतरण्याची वेळ आली असून, ऑलिंपिकमध्ये आपली गुणवत्ता त्यांना दाखवून द्यावी लागेल.