अॅड. प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस असावी- खासदार इम्तियाज जलील

0
300

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी  संपल्यात जमा आहे. अशावेळी एमआयएमला ८ जागा देऊ, असे सांगत वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत?  असा सवाल करून एमआयएमला सोबत घेऊ नका, अशी आरएसएसची फूस असावी,  अशी शंका  खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत  जलील बोलत होते.

यावेळी जलील म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने  ९८ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आंबेडकरांनी मान्य केला नाही. त्यानंतर आम्ही ७४ जागांचा प्रस्ताव दिला.  याही प्रस्तावाला   त्यांच्याकडून  कोणताच  प्रतिसाद मिळाला नाही.

विधानसभा निवडणुकांची तयारी करायला पुरेसा वेळ देता यावा, ओवेसींच्या सभांचे नियोजन करता यावे यासाठी ज्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्हाला सांगा अशी आमची मागणी होती. पण आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही, ओवेसी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, असे सांगत वंचितच्या प्रवक्त्यांनी पत्रके काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे जलील म्हणाले.