अॅट्रोसिटीतील आरोपींच्या अटकेसाठी तळेगावातील पीडित कुटुंब सोमवारपासून करणार पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन    

702

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – खोट्या गुन्ह्यातून माझ्या कुटुंबाची सुटका करण्यात यावी, खोटे गुन्हे रद्द करावेत, कुटुंबास २४ तास पोलीस संरक्षण द्यावे. तसेच अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर सोमवारपासून (दि. १९) बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे, असे मिनाक्षी साळवे यांनी म्हटले आहे.

याबाबत साळवे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे साळवे कुटुंब तळेगाव स्टेशन जवळील यशवंतनगर येथे राहत आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला कुख्यात गुंड किशोर गंगाराम आवारे, प्रमोद  सोपान सांडभोर व त्यांच्या इतर गंभीर स्वरूपाच्या सहकारी गुन्हेगारांकडून जीविताला धोका आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड दहशतीखाली भयभीत व तणावाखाली आहोत. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, वारंवार विनंती करूनसुध्दा तक्रार नोंद करून घेण्यास पोलीस अधिकारी जाधव यांनी नकार दिला.

त्याचप्रमाणे किशोर आवारे हा गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत असून त्याचे राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. उलट माझे पती प्रकाश गोपाळ साळवे, दीर महेंद्र गोपाळ साळवे, मुलगा तेजस प्रकाश साळवे, पुतण्या सिध्दार्थ महेंद्र साळवे यांच्यावर खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अडकविण्यात आले आहे. तरी त्यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.