अायात खासदारांवर भाजपच नाराज, सात ते अाठ जणांचे तिकीट कापणार?; पक्षाचे काम न केल्याचा ठपका

0
524

 

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या लाटेत महाराष्ट्रात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून काही मातब्बर नेते अायात करून त्यांना खासदारकीला निवडूनही अाणले. परंतु गेल्या चार वर्षांत यापैकी काही आयात खासदारांनी पक्षासाठी काहीच भरीव काम केले नसल्याचा निष्कर्ष भाजपच्या संघटनमंत्र्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात अाला अाहे. त्यामुळे अशा अायात खासदारांवर पक्षश्रेष्ठी नाराज असून २०१९ मध्ये त्यांचे तिकीटही कापण्याचा विचार केला जात अाहे. दरम्यान, चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील भाजपच्या २३ खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले अाहे. संघटनमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या अहवालांवरच अाता भाजपच्या खासदारांचे भवितव्य ठरणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

२०१४ मध्ये असलेली भाजपची लाेकप्रियता गेल्या चार वर्षांत घसरत चालल्याची प्रचिती काही राज्यांतील पाेटनिवडणुकांमधून येत अाहे. त्यामुळे अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र माेदी सावध झाले अाहेत. २०१९ मध्येही काेणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचीच सत्ता अाणण्यासाठी त्यांनी कंबर कसली अाहे, त्यासाठी मित्रपक्षांची मनधरणीही सुरू केली अाहे. दुसरीकडे गेल्या चार वर्षांतील कामगिरीचा अाढावा घेत भाजप खासदारांचे प्रगतिपुस्तकही तयार केले जात अाहे. सूरजकुंड येथे झालेल्या बैठकीत संघटनमंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. संघटनमंत्री पक्षाच्या खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार करून ते एक महिन्याच्या आत अमित शहा आणि नरेेंद्र मोदी यांच्याकडे पाठवणार आहेत.