अहो, मोदिजी…माझे कबुतर परत द्या की…

0
530

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – एका पाकिस्तानी कबुतरावर हेरगिरीचा आरोप ठेवत भारताने त्याला पिंजऱ्यात कैद केलं आहे. पण कबुतर हे शांतीचं प्रतीक असल्याचं सांगत आपलं कबुतर परत करावं, अशी मागणी एका पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

पाकिस्तानी नागरिक भारताच्या सीमेपासून फक्त 4 किलोमीटरवर राहतो. ईद साजरी करण्यासाठीच हे कबूतर उडवल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर कबुतराच्या एका पायात एक रिंग असून त्यावर एक कोड लिहिलेला आहे. याच कोडचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रामधील बातमीनुसार या पाकिस्तानी नागरिकाचं नाव हबीबुल्ला असं आहे. त्यांच्याकडे अनेक कबुतर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. “आपलं कबुतर म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. भारताने निष्पाप पक्षावर अत्याचार करू नयेत,” असं डॉन वृत्तपत्राशी बोलताना हबीबुल्ला सांगतात.

पाकिस्तानातून आलेल्या कबुतराला भारतीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पकडण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. 2015च्या मे महिन्यातसुद्धा भारत-पाक सीमेनजीक राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाला आढळून आलेलं एक पांढरं कबुतर भारताने ताब्यात घेतलं होतं. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या मजकुरासह एक कबुतर भारताने पकडलं होतं.

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात सातत्याने खटके उडताना दिसून येतात. मानवी हेरगिरीच्या आरोपांचीही अनेक उदाहरणं दोन्ही देशांदरम्यान आहेत. पण आता कबुतरांसारख्या पक्षांवरही हेरगिरीचे आरोप लावले जात आहेत