अहो आश्चर्यम्… महिलेने दिला नऊ बाळांना जन्म

0
510

बामाको, दि. ५ (पीसीबी) : माली या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने चक्क एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला. महिलेच्या गर्भात सात अर्भक असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. मात्र प्रसुतीवेळी तिच्या गर्भातून नऊ बाळांनी जन्म घेतला. बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप असल्याची माहिती माली सरकारने दिली आहे. 

25 वर्षीय हलिमा सिझ हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला. पश्चिम आफ्रिकेतील मालीसारख्या गरीब देशातील ही महिला आहे. तिची अधिकाधिक काळजी घेऊन प्रसुती करण्यासाठी तिला 30 मार्च रोजी मोरोक्को या उत्तर आफ्रिकन देशात स्थलांतरित करण्यात आले होते.

सात बाळं असल्याचा अंदाज
सुरुवातीला महिलेच्या गर्भात सात बाळं असल्याचा डॉक्टरांचा कयास होता. मोरोक्को सरकारने मात्र या अतिदुर्मीळ प्रसुतीबाबत जाहीर भाष्य केलेलं नाही. मोरोक्को आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्या देशातील रुग्णालयात अशी प्रसुती झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलं. परंतु माली सरकारने हलिमाने पाच मुलगे आणि चार मुलींना जन्म दिल्याची घोषणा केली. सिझेरियन करुन तिची प्रसुती करण्यात आली.

माली सरकारकडून दुजोरा
बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप आहेत. काही आठवड्यात ते माली देशात परततील, अशी माहिती मालीच्या आरोग्य मंत्री फँटा सिबी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिली. दोन्ही देशांच्या आरोग्य यंत्रणांचं त्यांनी अभिनंदनही केलं. मात्र हलिमाची प्रकृती आणि नऊ बाळांनी तग धरण्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांनी साशंकता व्यक्त केली आहे.