Maharashtra

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये चार बहिणी झाल्या आईच्या खांदेकरी

By PCB Author

April 17, 2019

जामखेड, दि. १७  (पीसीबी) – समाजात रुढी, परंपरांना छेद देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. समाजातील स्त्री-पुरुष भेदाभेद आजही पूर्णपणे मिटलेला नाही, याचा प्रत्यय वेगवेगळ्या घटनांमधून येत असतो. हे वास्तव आहे. या वास्तवाला छेद देणारी घटना नुकतीच जामखेड येथे घडली. सोमवारी जामखेड येथे चार मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. शांताबाई बोरा यांच्या चार मुलींनी ही कृती करत परिवर्तनाच्या वाटेवर आणखी एक पाऊल पुढे टाकले.

हे अत्यंत धाडसी पाऊल उचलताना या मुलींना आपण काही वेगळे करतो आहोत त्याची चर्चा व्हावी, असे काहीही वाटले नाही. त्यापेक्षा आपले मातृछत्र हरपले, याची वेदना अधिक होती. तरीही आपल्या उरीचे शल्य दडवत त्यांनी सोमवारी (१५ एप्रिल) निधन झालेल्या आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला छेद देणारी चार बहिणींची ही कृती समाजासाठी अनुकरणीय ठरली आहे.

जामखेड येथील शांताबाई बोरा यांचे ९० व्या वर्षी सोमवारी निधन झाले. मुली लहान असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे सर्व जबाबदारी एकट्या शांताबाईंवर पडली होती. त्यांनीही जैन स्थानकात सेवा करुन चारही मुलींना लहानाचे मोठे केले. नंतर यातील सर्वात मोठी बहीण असलेल्या चंद्रकला भंडारी यांनी उर्वरीत तिन्ही बहिणींची लग्ने केली. शेवटपर्यंत सेवा करून आपल्या आईने घेतलेल्या कष्टाची जाणीव चारही बहिणींनी ठेवली. शांताबाईंच्या निधनानंतर, चंद्रकला, रत्नमाला, कल्पना व छाया या चार मुलींनी, ‘आमच्या आईने कष्ट करून आम्हाला मोठे केले. त्यामुळे आम्हाला आमच्या आईला खांदा देण्याची इच्छा आहे,’ अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला व जुन्या परंपरेला छेद देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. जामखेड येथील या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार ठरलेल्या नागरिकांनी या घटनेची प्रशंसा केली आहे. मुलींनी आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श स्थापित केल्याचे मत उपस्थितांनी नोंदविले.

आईसाठी आम्हीच मुलं

‘आम्ही चारही बहिणी लहान असताना वडिलांचे छत्र हरपले. त्यातच आम्हाला भाऊ नाही. त्यामुळे आईनेच आम्हाला लहानाचे मोठे केले. त्याचबरोबर आईने आयुष्यात कधीही स्वतःला मुलगा नसल्याची खंत व्यक्त केली नाही. आईने आम्हाला मुलांप्रमाणेच वाढवले. आम्ही चार बहिणी आईसाठी मुलं होतो. त्यामुळे आम्हीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आम्हाला रीतीरिवाजाशी काही देणेघेणे नाही.’ अशी प्रतिक्रिया या चारही मुलींनी व्यक्त केली.