Maharashtra

अहमदनगरमधून सुजय विखेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून ‘या’ दोघांची चर्चा

By PCB Author

March 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता  राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणता उमेदवार रिंगणात असणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.  यासंदर्भात आज (बुधवार) संध्याकाळी मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.

अहमदनगर लोकसभेसाठी भाजपने सुजय विखे-पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप किंवा प्रशांत गडाख यांना रिंगणात उतरवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

अहमदनगरची जागा सुजयसाठी मिळावी, यासाठी  काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. या जागेसाठी  विखे पाटील यांनी शरद पवारांकडे विनंती केली होती. परंतु पवारांनी ही जागा सोडण्यास ठाम नकार देत येथून राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहिल आणि निवडून येईल यात वादच नाही, असे शरद पवारांनी म्हटले होते.