Pimpri

अस्वच्छता करणा-यांवर कारवाईचा बडगा; सव्वा कोटीचा दंड वसूल

By PCB Author

November 06, 2022

पिंपरी,दि.०५(पीसीबी) – रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोडा टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणा-यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली असून नऊ महिन्यांत तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.

शहरातील अनेक नागरिक स्वच्छतेचे नियम मोडत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यात रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोड टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणे यासह विविध नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून महापालिकेला तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.