असदुद्दीन ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना दिला बंद लिफाफा; चर्चांना उधाण

0
607

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना एक बंद लिफाफा दिला आहे.  हैदराबाद येथे २६ ऑगस्ट रोजी ओवेसी आणि आंबेडकर यांच्यात   बैठक होणार आहे. त्यामुळे या  लिफाफ्यात नेमके काय आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.   

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला १४४ जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएम नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी  खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेले पत्र अॅड. आंबेडकर यांच्याकडे सोपविले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. त्यात ‘एमआयएम’ने एकच जागा लढवली. त्या जागेवर इम्तियाज जलील निवडून आले.

विधानसभेसाठीही  आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून  ‘एमआयएम’ने वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने ‘एमआयएम’सोबत चर्चा करण्यासाठी एक समिती तयार केली आहे.  दरम्यान, वंचित  आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास ‘एमआयएम’ची  गोची  होऊ शकते. या कारणामुळे ओवेसी यांनी बंद लिफाफा  दिल्याचे सांगितले जात आहे.