Maharashtra

अशा लोकांवर पोलिसांनी लाठीला तेल लावून कारवाई करावी – अनिल देशमुख

By PCB Author

March 25, 2020

 

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अजुनही करोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधत, पुढील २१ दिवस संपूर्ण देशात लॉक डाऊन करणार असल्याचे सांगितले. तुमचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्वाचे आहे, घराबाहेर पडलो तर करोनाचे सकंट अधिक गडद होईल असे सांगायलाही पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. या काळात जीवनावश्यक सेवांचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.

याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात अनिल देशमुख बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातही पोलिस कर्मचारी गेले काही दिवस या नियमाचं काटेकोर पालन करताना दिसत आहे. जनता कर्फ्यू पासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिस लाठीने चोप देत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही लोकं घराबाहेर पडत आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना खास आदेश दिले आहेत. “यापुढे लाठीचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, देशाचे पंतप्रधान वारंवार घराबाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत. तरीही समाजातील काही ५-१० टक्के लोकं घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांसाठी पोलिसांनी हातात लाठी घेऊन तयार रहावे. लाठीला तेल लावून अशा लोकांवर कारवाई केल्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही.”