…अशा परिस्थितीमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर बंदी येणार ?  

0
1452

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – आणीबाणी सदृश्य परिस्थिती  आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्यास   किंवा देशांतर्गत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास फेसबुक,  व्हॉट्सअॅप,  इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. अशा परिस्थितीमध्ये  अफवा रोखण्यासाठी आणि परिस्थिती आटोक्यात राहावी, या हेतूने सरकार हा निर्णय घेणार आहे. या संदर्भात सरकारने  माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षा धोक्यात येत आहे, असे सरकारच्या लक्षात आल्यास सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट ब्लॉक करण्याबाबत सरकार विचार करत आहे. दूरसंचार मंत्रालय याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी चर्चा सुरू करणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने  टेलिकॉम ऑपरेटर,  भारती इंटरनेट सेवा प्राधिकरण, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आदी दूरसंचार कंपन्यांना पत्र लिहिले आहे. तसेच  सोशल मीडियावरील बंदी आणण्याबाबत सल्ला मागितला  आहे. त्याचबरोबर विधी खात्याचाही सल्ला घेतला जाणार आहे.

माहिती व तंत्रज्ञान कायदा ६९ ए अंतर्गत सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचा सरकारला अधिकार आहे. अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडियावरून अफवा पसरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जमावाकडून लोकांच्या हत्या झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. भारतात व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यावरूनच सर्वाधिक अफवा पसरविल्या जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर अंकुश लावण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे.