Maharashtra

अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले

By PCB Author

November 06, 2018

चंद्रपूर, दि. ६ (पीसीबी) – मौशी-चौरगावजवळ अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या एका स्कॉर्पिओ चालकाने कारवाई करण्यासाठी आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळाच्या सुमारास घडली. चंद्रपूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

छत्रपती चिडे असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्कॉर्पिओ गाडीतून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती नागभीड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागभीड पोलीस मौशी-चोरगावजवळ गोसी खुर्द कालव्याजवळ दबा धरून बसले होते. पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडेंसह इतर कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्कॉर्पिओ न थांबल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी तस्कराची गाडी ट्रकला धडकली. पोलीस या तस्कराला पकडायला पुढे गेले. त्याचवेळी स्कॉर्पिओ चालकाने चिडे यांच्यासह इतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. चिडे या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चिडे यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.