”अवघड, धारदार आणि बोचरे प्रश्न विचारा, पण…..”

0
320

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारावेत असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना एक आवाहनही केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “मी सर्व पक्षांना आणि खासदारांना हे आवाहन करू इच्छितो की, जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारा, धारदार, बोचरे प्रश्न विचारा मात्र सरकारला शांततेत, शिस्तबद्ध रितीने त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची संधीही द्या. यामुळे लोकशाही आणि लोकांचा विश्वास अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसंच विकासाची गतीही वाढेल.”

“मला असं वाटतं, करोना महामारीबद्दलच्या प्रत्येक अडचणीवर आणि त्याविरुद्धच्या लढ्यावर चर्चा होईल. मी सर्व सदस्यांना ही विनंती करतो की त्यांनी उद्या संध्याकाळी ४ वाजता या करोना महामारीशी संदर्भातल्या चर्चेस उपस्थित राहावे”, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांना करोना परिस्थितीवर प्राधान्याने वादविवाद, चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावं. किमान पहिला डोस तरी त्वरीत घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन, आज सोमवारपासून सुरू होत आहे. करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आदी मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून, अनेक विधेयके मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असेल. दरम्यान अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.