अल्पसंख्यांकांशी कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू – इम्रान खान

0
636

लाहोर, दि. २३ (पीसीबी) – भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नाही, असे भारतातील काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांसोबत कसे वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, असे  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना समान अधिकार मिळतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

लाहोरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इम्रान खान बोलत होते. यावेळी त्यांनी दुर्बल घटकांना न्याय दिला नाही, तर असंतोष पसरु शकतो. ही बाब सिद्ध करण्यासाठी त्यांनी बांगलादेशचे उदाहरण दिले. पूर्व पाकिस्तानातील लोकांना न्याय मिळाला नाही, त्यामुळेच बांगलादेशचा जन्म झाल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना योग्य न्याय मिळावा, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असेल. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा दृष्टीकोनही हाच होता, असे ते म्हणाले.

अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी मुलांना भारतात ठेवायला भीती वाटते, असे विधान केले होते. यावर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर यावर नसीरुद्दीन शहा यांनी प्रत्युत्तर देताना इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत फटकारले.