अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि अपहरण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

0
249

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – एका अल्पवयीन मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या मावस बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 15) रात्री निगडी परिसरात घडला. याबाबत पोलिसांनी चार तासात पाच जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपींची पोलीस कोठडीत तर तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आशिष आनंद सरोदे (वय 20) याला सात दिवसांची तर करण भैरवनाथ साबळे (वय 21) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी निवास संजय सुतार (वय 20), तेजस राजू वाघमारे (वय 19), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय 21, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने मंगळवारी रात्री एका अल्पवयीन मुलीला अंधारात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिथे पीडित मुलीची मावस बहीण आली असता आरोपी करण याने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

त्यानंतर आरोपी करण आणि आशिष या दोघांनी अन्य आरोपी निवास, तेजस आणि कार्तिक या तिघांना बोलावून घेतले. सर्व आरोपींनी मिळून दोन्ही मुलींना लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसवून चिंचवड स्टेशन येथे नेले. स्टेशन चौकात दोन्ही मुलींना सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पालकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 376, 354 (ब), 34, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 2012 चे कलम 3, 4, 7, 8, 11, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपयुक्त मंचक इप्पर आणि सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी निगडी पोलिसांची तीन पथके तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केली. पोलिसांनी चार तासात पाचही आरोपींना अटक केली. आज (गुरुवारी, दि. 17) आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने आरोपी आशिष याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी करण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर आरोपी निवास, तेजस आणि कार्तिक यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक निरीक्षक विजयकुमार धुमाळ, स्वाती खेडकर, उपनिरीक्षक राजेश मोरे, पोलीस कर्मचारी सतीश ढोले, किशोर पढेर, रमेश मावसकर, शंकर बांगर, प्रमोद गेंगजे, संदीप कांबळे, विलास केकाण, राहुल मिसाळ, भूपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विजय बोडके, विठठल भारमल, बाळासाहेब नंदुर्गे यांच्या पथकाने केली आहे.