Pimpri

अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून विनयभंग केल्याच्या दोन घटना; तिघांना अटक

By PCB Author

October 17, 2021

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एका प्रकरणात पिंपरी तर दुस-या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडित मुलीने शनिवारी (दि. 16) फिर्याद दिली. त्यानुसार सैफी अस्लम शेख (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ट्युशनसाठी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. 16 ऑक्टोबर रोजी मुलीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडून मैत्री करशील का, असे विचारले. तसेच तिला धमकी देऊन तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात देखील एका अल्पवयीन पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज दत्ता पाटील (वय 23), दत्तात्रय लहू पाटील (वय 47, दोघे रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी पृथ्वीराज हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपीने शुक्रवारी रात्री नऊ वाजता प्राधिकरण निगडी येथे मुलीवर पाळत ठेवली. तिला शिवीगाळ व मारहाण केली. सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट सुरु करून त्यावरून पीडित मुलीला धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.