अल्जेरियाच्या लष्करी विमानाला भीषण अपघात झाला आहे. अल्जेरियाची राजधानी बोयुफारीक विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान शेतामध्ये कोसळले. अपघाताच्यावेळी Ilyushin Il-78 या लष्करी वाहतूक विमानामध्ये जवळपास १०० लष्करी सैनिक यामध्ये होते.

कोसळल्यानंतर लगेचच या विमानाने पेट घेतला. सध्या अपघाताची जी छायाचित्र समोर आली आहेत त्यामध्ये आगीच्या ज्वाळा, काळया धुराने परिसर व्यापून टाकल्याचे दिसत आहे. रशियन बनावटीचे हे Ilyushin Il-78 वाहतूक विमान दक्षिण-पश्चिमेला बीचरच्या दिशेने चालले होते.

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु झाले असून १४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बोयुफारीक उत्तर अल्जेरियात असून भूमध्य समुद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. ४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी लष्कराचे विमान कोसळून ७७ जणांचा मृत्यू झाला होता.