Desh

अलिबागचा बंगला पाडला; मात्र नीरव मोदी लंडनमध्ये आलिशान बंगल्यात निवांत  

By PCB Author

March 09, 2019

नवी दिल्ली , दि. ९ (पीसीबी) –  पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला  पाडला जात असतानाच मोदी मात्र, लंडनमध्ये  उजळ माथ्याने फिरत असल्याचे समोर आले आहे.  याबाबतचे वृत्त  ‘द टेलिग्राफ’ या लंडनमधील वृत्तपत्राने दिले आहे.

नीरव मोदी वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत  आहे, असे ‘टेलिग्राफ’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सेंटर पॉईंट टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये नीरव राहत आहे, असा दावा केला जात आहे. लंडनमधील रस्त्यावर फिरताना वेगळ्याच लूकमधील नीरवशी ‘टेलिग्राफ’च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत नीरव मोदीला  रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.  त्याच्यावर १३ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा  आरोप आहे. त्याचा अलिबागच्या समुद्रकिनारी असलेला अलिशान बंगला सरकारने  शुक्रवारी  स्फोटाच्या सहाय्याने पाडण्यास सुरूवात केली आहे.