Desh

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी नेत्याची पार्टीदरम्यान गोळ्या घालून हत्या

By PCB Author

November 02, 2018

अलाहाबाद, दि. २ (पीसीबी) – अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी नेत्याची विद्यापाठीच्या वसतीगृहात आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली.

सुमित शुकला असे हत्या झालेल्या विद्यार्थी नेत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या एका महाविद्यालयातील विद्यार्थी नेत्याने हा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठातील वसतीगृहात गुरुवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, काही कारणास्तव अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि सीएमपी डिग्री कॉलेजचे विद्यार्थी यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद काही वेळातच आणखी पेटला. दरम्यान, सीएमपी कॉलेजच्या विद्यार्थी नेत्याने थेट पिस्तूलच बाहेर काढले आणि ते अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्यावर रोखले. काहीवेळात त्याने गोळीबारही केला. या गोळीबारात अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेता ठार झाला. प्रयागराजचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव तपास करत आहेत.