Banner News

अर्थसंकल्पात शिवस्मारकासाठी ३०० कोटी, तर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद

By PCB Author

March 09, 2018

राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवारी) दुपारी २ वाजता विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी ३०० कोटी आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच उत्पादन खर्च मर्यादित राहण्यासाठी सेंद्रिय शेती- विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी स्वतंत्र योजनेसाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता ४० कोटींची तरतूद केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे. त्याचबरोबर तरुण- तरुणीमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने ६ कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे.

ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी १६० कोटी  निधी उपलब्ध केला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी इतका विशेष निधी दिला आहे. कोकणातील खार बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच खार बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद केली आहे.