अर्थव्यवस्थेच्या दुरुस्तीची भावनाच सत्ताधाऱ्यांत नाही – शरद पवार

0
360

सांगली, दि.१४ (पीसीबी) – देशाची अर्थव्यवस्था संकटात असून ती दुरुस्त करण्याची भावनाच सत्ताधाऱ्यांमध्ये नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगलीत केली.

देशाची सत्ता केवळ दोनच माणसांच्या हाती एकवटली असून सत्ताधारी पक्षातील लोकही दहशतीखाली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशात सत्ता परिवर्तन व्हावे, अशी लोकांची भावना असल्याचे दिल्लीतील ‘आप’च्या विजयावरून स्पष्ट होत असल्याचे सांगून ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, ती दुरुस्त व्हावी अशी भावनाही सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नाही. याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत. केवळ दोनच लोकांच्या हाती सत्ता एकवटल्यामुळे नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेत बदल होतील, असेही वाटत नाही. सत्ता परिवर्तन व्हावे अशी लोकांची इच्छा आहे, हे मान्य असले तरी सध्या ते अशक्य आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. मात्र बदल हवा असलेल्या लोकांच्या इच्छेचा सन्मान करून प्रादेशिक पातळीवर प्रबळ असलेल्यांनी एकत्र यायला हवे, अशी आमची भूमिका आहे. बदलासाठी अनुकूल असलेल्या प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आपणास वाटते. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत पवार म्हणाले, या कायद्यातील काही तरतुदी आवश्यक वाटत असल्या तरी एका समाजाला बाजूला ठेवून निर्णयाची अंमलबजावणी करणे अयोग्य आहे.

यावेळी, श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या एसबीजीआय इन्स्टिटय़ूटमध्ये राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पालकमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित होते.