अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यावर हक्कभंग दाखल करणार – धनंजय मुंडे

0
562

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे महसूल उत्पन्न गेल्या चार वर्षांच्या काळामध्ये घटले आहे, असे १५ व्या वित्त आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. उद्योग, व्यवसाय आणि धंदे डबघाईला  आल्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे  आगामी अधिवेशनात अर्थमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार आहोत, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  

राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असल्याने सरकारने श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर खरी माहिती जाहीर करण्याची मागणी आपण विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात करत आलो आहोत. मात्र, सरकारने प्रत्येक वेळी आकड्यांचा खेळ करून सत्य लपवले आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.

महाराष्ट्रात २००९ ते २०१३ च्या कर उत्पन्नाच्या तुलनेत २०१४ ते २०१८ या कालावधीत  कर उत्पन्न ९ टक्यांनी घटले आहे, असे वित्त आयोगाच्या अहवालात म्हटले आहे, असे मुंडे यांनी सांगितले. फडणवीस सरकारने नागरिकांवर भरमसाठ  कर लादले आहेत. तरीही उत्पन्न घटले आहे. राज्यातील उद्योग, व्यवसाय व धंदे डबघाईला आले आहेत,  असा दावाही मुंडे यांनी केला.