Maharashtra

“अर्णब गोस्वामींनी TRP साठी ४० लाख आणि सहलीसाठी १२ हजार डॉलर दिले”

By PCB Author

January 25, 2021

मुंबई,दि.२५(पीसीबी) – बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सऍप चॅटमुळे वातावरण तापलं आहे. त्यातच आता बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी दावा केलाय की, रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी त्यांना दोन वेगवेगळ्या हॉलीडेसाठी एकूण 12 हजार अमेरिकी डॉलर दिले आहेत. शिवाय तीन वर्षाच्या काळात अर्णब यांनी रिपब्लिक चॅनेलला लाभ मिळवून देत TRP रेटिंग हाताळण्यासाठी आतापर्यंत 40 लाख रुपये दिले आहेत. दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना यासंबंधी लिखित जबाब दिला आहे.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 3,600 पानांची चार्जशीट 11 जानेवारीला दाखल केली आहे. यात बार्कची फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट, पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सऍपचॅटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात 59 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक चॅनलचे नाव घेण्यात आले आहे. Republic, Times Now आणि Aaj Tak यांच्यावर TRP रेटिंगमध्ये छेडछाड करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पार्थो दासगुप्ता, बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगर्हिया, रिपब्लिक मेडिया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास कांचनदानी यांच्याविरोधात पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली होती. नोव्हेबर 2020 मध्ये 12 व्यक्तींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात लिहिलंय की, मी अर्णब गोस्वामी यांना 2004 पासून ओखळतो. आम्ही Times Now मध्ये एकत्र काम करायचो. मी 2013 मध्ये बार्कचा मुख्य कार्यकारी अधिकारी झालो. रिपब्लिक टीव्हीची स्थापना करण्यापूर्वीपासून अर्णब मला लॉचिंगच्या योजना सांगायचा आणि मला अप्रत्यक्षपणे चॅनेलच्या चांगल्या रेटिंगसाठी मदत करण्यासाठी खूनवायचा. अर्णबला माहिती होतं की मला TRP सिस्टिम कशी काम करते हे माहिती होतं. त्याने मला भविष्यात मदत करण्यासाठी सांगितलं होतं.

मी माझ्या टीमसोबत मिळून रिपब्लिक टीव्हीला एक क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. हे 2017 ते 2019 पर्यंत सुरु होतं. अर्णबने मला या काळात फ्रान्स आणि स्वित्झलंडच्या सहलीसाठी 6000 डॉलर दिले. त्यानंतर स्वीडन आणि डेन्मार्कच्या सहलीसाठी 6000 डॉलर दिले. अशाचप्रकारे अर्णबने मला आयटीसी परेल हॉटेलमध्ये 20 लाख आणि नंतर 10 लाख रोख दिले, असं दासगुप्ता म्हणाले आहेत.