अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश

0
724

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्पाचे काम तांत्रिक मान्यतेशिवाय येत्या १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश एल अँड टी  कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज (सोमवार) येथे दिली. 

१ मार्च २०१८ पासून ३६ महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट अॅग्रिमेंटमध्ये दिल्या  होत्या. मात्र तांत्रिक समितीची मान्यता नसल्याने स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी साडे सात महिन्यांनी मुदत वाढली. काम सुरू होण्याआधीच स्मारकाची किंमत ६४३ कोटींनी वाढली आहे.

शिवस्मारकाची जागा राजभवनापासून १.२ किमी, गिरगाव चौपाटीपासून ३.६ किमी आणि नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर आहे.६.८ हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१० मीटर उंचीचा पुतळा आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती