अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर बांधा; शिवसेनेची लोकसभेत मागणी

0
521

मुंबई, दि, २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रापक्षांना अनेकांच्या मेहनतीमुळे घवघवीत यश मिळाले आहे. तसेच हे यश मिळण्यास प्रभू श्री रामांचा देखील आशीर्वाद आहे. तसेच देशात एक मजबूत सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले आहे. त्यामुळे रामाचे स्मरण ठेवत केंद्र सरकारने तातडीने अयोध्येत पवित्र राममंदिर निर्माणाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे लोकसभेतील खासदार विनायक राऊत यांनी राममंदिर निर्माणाचा मुद्दा उचलून धरला. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जावे ही देशातील कोटयावधी हिंदूंची भावना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करून राममंदिर निर्माणाच्या चळवळीला वेग दिला दिला, असे विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह अयोध्या दौरा काढला होता. लोकसभा निवडणुकीनंतरही उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला गेले होते. राममंदिरासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. या सरकारकडून देशातील हिंदूंना मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती दाखवत सरकारने राममंदिर निर्माणाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी खासदार राऊत यांनी या वेळी केली.