अयोध्येत तणाव! उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय

0
1637

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत चालला असून व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना आहे. विश्व हिंदू परिषदेने गुरूवारी मनाई हुकुम झुगारून देत रविवारी होणाऱ्या धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येमध्ये रोड शो केला.

अयोध्येमध्ये यापूर्वी घडलेल्या घटना आणि राम मंदिर मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येला एक किल्ल्याचे स्वरुप आले आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकडय़ा तैनात आहेत. वादग्रस्त जागेवर सद्य स्थिती कायम रहावी. कुठल्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये असे स्पष्ट आदेश आहेत. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

रामजन्मभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकांना आजही ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भिती वाटत आहे. अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.